कांदेपोहे




माझा कांदेपोहे प्रोग्राम (कापो) ताई आणि जीजू कडे होता..आम्ही आदल्या दिवशी तिच्याकडे गेलो होतो..खूप दूरचा प्रवास झाल्याने सगळे दुसऱ्या दिवशी आरामात उठले..ताई सुद्धा तिच्या सासरच्या गावी असल्यामुळे आदल्या दिवशी आमच्या सोबतच तिच्या घरी आली होती..घर 10 दिवस बंद असल्यामुळे आम्ही सकाळी मग साफ सफाई चालू केली 11 पर्यंत सफाई आणि बाकीच्या arrangement होईपर्यंत मुलाच्या घरून फोन आला की आम्ही जवळपास आलोय घरचा proper पत्ता पाठवा..हे ऐकून सगळ्यांची तारांबळ उडाली मी तर माझा अर्धा scrub केलेला चेहरा वॉश करून लगेच साडी गुंडाळून बसले.. माझे केस प्रवासामुळे अतिशय खराब झाले होते काही केल्या नीट बसेना मग straightning हाच एक सुटकेचा मार्ग मला दिसला तसे मी कमरे इतके लांब फ्रीझी केस घेऊन भूत बनून बसून राहिली..अथक प्रयत्नानंतर अर्धे केस सरळ झाले तोच बाहेर गाडीचा आवाज आला आता माझ्याकडे अर्धे केस तसेच ठेवण्यावाचून काही पर्याय नव्हता..मी नेसलेली साडी ताईला अजिबात आवडत नव्हती पण पाहुणे बाहेर हॉल मधे बसले असताना साडी बदलणे मला अजिबात पटत नव्हते..शेवटी ताईला जी साडी माझ्यासाठी आवडत होती ती तिने स्वतः नेसली आणि अचानक ती इतकी सुंदर दिसू लागली की मला ती साडी नेसायचा मोह आवरेना मग मी आधी टापटीप नेसलेली साडी बदलून ताईने गडबडीने मला ती साडी नेसवली..आमचं साडी पुराण संपेपर्यंत पाहुण्यांचा नाश्ता होत आला होता..ताई आता माझ्यावर जाम चिडली होती तीच म्हणणं होत आधीपासून काय तुला जर्मन मधे सांगत होती का ही साडी नेस.. ती आता किचन मधे आई आणि काकूला खिंड लढवायला मदत करू लागली..माझ्या मदतीला काकूंच्या 14 वर्षाच्या मुलीला सोडून गेली जिने बीचारीने आपल्या पोह्याच्या प्लेटवर फुल्ल फोकस ठेऊन दोन वेळा नाश्ता करून घेतला..एक माझ्या नावाची पण फ्रूट डिश गट्टम् केली पण माझ्याकडे काही ढुंकून पाहिले नाही मग मी जमेल तसे तयार होऊन बसली तोच नेमकी त्या दिवशी लाईन गेली घामाने माझे आधीच अतिविचीत्र दिसणारे केस पूर्ण पाठीला चीपकले चेहऱ्यावरून घामाच्या धारा ओघळू लागल्या..कधी नव्हे ते साडी घातली होती त्यात लाईट नाही भयंकर हाल झालेत..नशीब चांगल म्हणून पटकन लाईट आली..पाहुणे माझी वाट पाहून कंटाळून गेले होते..शेवटी माझा भाऊ मला घ्यायला आला..घरी असताना डोक्यावर पदर घ्यायला विरोध करणारा माझा भाऊ माझे केस पाहून स्वतःच म्हंटला बाई डोक्यावर घे पदर.. बाहेर मुलगा त्याचा भाऊ आणि त्याचे वडील शिवाय माझे बाबा भाऊ आणि jiju होते इतके लोक पाहून माझी घाबरगुंडी उडाली एकतर पहिलाच कार्यक्रम त्यात डोक्यावर पदर माझे हात आपोआप चहा देताना थरथरायला लागले.. डोक्यावरचा पदर काही केल्या तिथं टिकेना..सारखा पदर वर करण्याच्या चक्कर मधे भावाच्या हातातला ट्रे मी हवेत भिरकावून दिला नशीब त्यातले चहाचे कप आधीच पाहुन्या पर्यंत पोचले होते नाहीतर बिचारे चहा चे डाग अंगावर घेऊन परत गेले असते.. 

मग माझा मोर्चा बायकांकडे वळला..तिथे सुद्धा असाच गोंधळ.. इतकी खंडीभर लोक..मुलाच्या दोन्ही वहिन्या आई..दोन्ही वहिन्यांचे प्रत्येकी एक एक बाळ..माझी आई बहीण काकू..काकूंची मुलगी.. आणि या सगळ्या गराड्यात खुर्चीवर बसलेली कावरी बावरी मी.. मी येऊन नुकतीच बसली होती अजून थरथरणारे हात पाय कमी झाले नव्हते तोच अचानक बेडवरून त्यांच्या वहिनीच्या 3 वर्षाच्या मुलीने माझ्या अंगावर मोगली सारखी उडी मारली आणि मासी चलो ना बाहर म्हणून जे मागे लागली की तिला तिच्या आईने धपाटे देईपर्यंत तिने मला सोडल नाही..मग माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली..मी जमेल तशी उत्तरे दिल्यानंतर सगळेजण चिडीचूप होऊन त्या दोन नटखट बालिकांचा गोंधळ पाहत बसले..मला बाहेर बोलवण्यात आले मी मुलाच्या मोठ्या भावाच्या अगदी समोर खुर्चीवर बसले.. त्याने मला नाव काय शिक्षण काय असे बेसिक प्रश्न विचारले आणि मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुला स्वयंपाक करता येतो का.. मला आईने सांगितले होते की सगळ खरचं सांगायचं.. त्यामुळे मी हां थोडा बहोत बना लेते है असं सरळ खरखुर उत्तर दिलं..यावर मुलाचा आगाऊ भाऊ म्हणाला थोडा बहोत मतलब रोटिया बना लेती हो और सब्जी मेरे भाई को बनानी पड़ेगी क्या? यावर सगळ्यांचा हास्यकल्लोळ..आणि मी पण आपण कोण आहोत कुठे बसलोय विसरून जोरात हसायला लागली..ताईने इशाऱ्याने मला आठवण करून दिली की जरा दात कमी दाखव..मग मुलाच्या भावाने मुलाला प्रश्न विचारायला सांगितले..तेव्हा मी पहिल्यांदा त्याच्याकडे पाहिले तो बिचारा खाली मान घालून नको नको म्हणत होता..भाऊ ४ ५ वेळा म्हणे अरे विचार काहीतरी..तो परत..खाली मान आणि नहीं नहीं..मी एकटक त्याच्याकडे बघत..त्याचे वडील मला बघत.. माझी ताई त्याच्या वडिलांना बघत.. मस्तच ड्रामा चालू होता..मग मला परत बायकांकडे पाठवण्यात आले..तिथे गेल्याबरोबर ती लहान मुलगी (३ वर्षे) परत मला चीपकली..माझ्या अंगावर सगळे चॉकलेट चे ओघळ.. तिच्या आईने परत तिला बेडवर बसवून सोप सुपारीचा डब्बा तिच्या हाती दिला..तिने बेडवर सगळा धिंगाणा केला..सोप सुपारीचा डब्बा बाहेरच्या लोकांना द्यायचा होता ती जाम तो सोडेना मग रडून तिने सगळ घर डोक्यावर घेतलं..शेवटी राहू द्या तिच्याजवळ डब्बा म्हणून वातावरण शांत केलं..मग हीचा गोंधळ कमी की काय म्हणून लहानी (१ वर्ष) पण उठली..त्यात ताईचा लहान मुलगा (४ वर्षे) आणि तिघांची एकाच खेळण्यासाठी मारामारी..मला तर हसू आवरेना..एकाला चूप करायचं तर दुसरा गोंधळ करायचा..मुलाच्या वडिलांना अचानक काहीतरी आठवले त्यांनी परत मला बाहेर बोलावले..मी त्यांच्यासमोर बसली असताना ताईच्या लहान मुलाने नवऱ्या मुलासमोर ठेवलेली फ्रूट डिश उचलून ऐटीत माझ्या मांडीवर बसून स्वतः गट्टम् केली..तेव्हा मला हसूच आवरेना..तो बिचारा बसला तसाच..मुलाच्या वडिलांनी मला विचारले की बेटा तू तशी तर आमच्या मुलासोबत नोकरी च्या ठिकाणी राहशील पण सुट्ट्यांमध्ये त्याच्यासोबत गावाकडे येशील ना? मी हो म्हंटले तसा त्यांचा चेहरा एकदम खुलला माझ्या डोक्यावर हात ठेऊन तोंडभरून त्यांनी मला आशीर्वाद दिला..बाहेरगावी नोकरी करणाऱ्या आपल्या आई बाबांपासून दूर राहणाऱ्या आपल्या लेकरांसोबत राहण्यासाठी आई वडील किती अधीर झाले असते हे तेव्हा समजले..मग सगळे प्रश्न उपप्रश्न लहान मुलांचा गोंधळ सगळ आवरतं घेत आम्ही जेवायला हॉटेल ला जायला निघालो..मुलाची आई म्हणे तुला साडी comfortable नसेल तर ड्रेस घालून घे आता त्यांना कुणी सांगावं मी नुसते जीन्स घेऊन आलीये ड्रेस कुठला घालणार.. मी पटकन आत जाऊन साडी नीट केली..केसांमुळे डोक्यावरचा पदर काही सुटला नाही.. तसेच हॉटेल ला गेलो ३.३० वाजत आले होते मला जाम भूक लागली होती एकतर सकाळपासून पोटात काहीच नव्हत..हे लोक कधी जेवण ऑर्डर करतील आणि कधी मी पोटभर खाऊ असं झालं होत तेवढ्यात माझा चेहरा आणि चेहऱ्यावरील एकंदरीत भाव पाहून ताईने मला मेसेज केला की जेवण नीट माणसासारख करशील जास्त अधाशिपणा दाखवू नको.. माझा चेहरा खरकन उतरला..४ वाजता जेवण आल..तोपर्यंत मी washroom च्या बहाण्याने बाहेरची हवा खाऊन आले..ताईचा मुलगा आणि त्याच्या दादाची मुलगी भयंकर धिंगाणा घालत होते पूर्ण हॉटेल मधले लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते..पूर्ण हॉटेल मधे धावणे पकडा पकडी खेळणे इथल्या प्लेट उचलून तिथे ठेवणे खुर्ची इकडची तिकडे सरकवणे तिथली ताट वाटी वापरून घर घर खेळणे..दोघांनी सगळ्या बायकांच्या नाकात दम आणला होता..माणसं मात्र हसत खेळत जेवण करत होती..मुलाच्या मोठ्या भावाने त्यांच्या लहान मुलीला जेवू घातले तीच diper बदलून दिलं हे पाहून बरं वाटल..याचा लहान भाऊ पण असाच असेल असे वाटून मनोमन आनंद झाला.. माझी आजची भूमिका म्हणजे फक्त बघ्याची होती मी काहीही बोलू शकत नव्हती लहान पोरांसोबत खेळू शकत नव्हती जेवताना सुद्धा खूपच शांत हळूहळू जेवली..मला अजिबात तिथे करमत नव्हतं जेवण झाल्यावर मी परत washroom ला पळाली.. मुलाची वहिनी सुद्धा माझ्या मागे आली..आम्हाला दोघींना एकांत मिळताच तिने मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला बाई ग तू असा दिवसभर डोक्यावर पदर घेऊन का मिरवत आहेस..तुला फार आवडत का अगदी असं ट्रॅडिशनल राहायला..मी म्हणायला तर हो म्हणून दिलं पण मला इतकं भयंकर हसू येत होत की सांगू शकत नाही..त्यात ताईचा मुलगा आला पाठीमागे.. सुसू करतो म्हणे..मग त्याला लेडीज toilet मधे नेत होती तर जो रडायला लागला अजिबात गेला नाही..मी बॉय आहे मी गर्ल्स टॉयलेट मधे नाही जात वगैरे आगाऊ शहाणपणाच्या गोष्टी बोलायला लागला..कितीही समजावलं तरी जाम ऐकेना..आम्ही तसेच तिथे उभ्या राहिलो आणि तितक्यात समोरून नवरा मुलगा आला.. जेंट्स toilet अगदी बाजूला होत..त्याच्या वहिनीने त्याला situation सांगितली.. त्याने माझ्याकडे पाहिले..मी त्याच्याकडे पाहिले..पहिल्यांदा आमची नजरानजर झाली.. तो माझ्याकडे पाहून अगदी गोड हसला..आयुष्यात पहिल्यांदा मी लाज लाज लाजली..अगदी फिल्मी वाटतं होत मला तर सगळं.. तो ताईच्या मुलाला आत घेऊन गेला..आम्ही वापस आमच्या जागेवर येऊन बसलो..छान हसत खेळत जेवण झाली आम्हाला कुणालाच वाटले नाही की आम्ही पहिल्यांदा भेटत आहोत.. five star हॉटेल असल्यामुळे बिल भयंकर आलेलं होत..माझे jiju माझा भाऊ आणि नवरा मुलगा मी देतो मी देतो म्हणून घासाघीस करत बसले होते.. नवरा मुलगा मनापासून पैसे भरायला तयार आहे म्हणजे कंजूस नाही (शॉपिंग चा प्रश्न सुटला ;-) ) हा पॉईंट पण माझ्या मनाने नोट करून घेतला..सगळं आटोपून आम्ही एकदाचे बाहेर पडलो..मी सगळ्यांच्या पाया पडली (की लागली) मुलाच्या आईने मला घट्ट मिठी मारली.. मी पण त्यांना काळजी घ्या वगैरे सांगून सून असल्यासारखं कर्तव्य बजावल :-D जाताना त्यांनी ताईच्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले तर हा दीड शहाणा त्याच्या वहिनीच्या मुलीला ते पैसे देऊन आला आणि म्हणे तू तुझ्यासाठी छान छान खेळणे घे माझे खेळणे मलाच राहू दे आमची हसून हसून पुरेवाट झाली..मग परत नमस्कार चमत्कार झाले आणि पाहुणे गाडीत बसून परत निघाले..मी डोक्यावरचा पदर काढून फेकला आणि हुश्श केलं..

रात्री दहाच्या दरम्यान मुलाच्या वडिलांचा फोन आला की तुमची मुलगी आम्हाला खूप आवडली तुम्हाला आमचा मुलगा कसा वाटला? 

मला वाटतं दिवसभर माझ्या डोक्यावर असलेला पदर पाहून ते लोक इंप्रेस झाले असतील ;-) ( just kidding )

Comments

Popular posts from this blog

वाढदिवस...

झंझावात..